पुसदचा इतिहास काय आहे?

पुसद म्हणजे अजिंठा डोंगररांगांच्या प्रदेशात आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळनंतरचे दुसरे मोठे तालुक्याचे ठिकाण. या गावाच्याच नावावरून परिसरातील टेकड्यांना पुसदच्या टेकड्या म्हणतात.

यवतमाळ जिल्हा , चित्रस्त्रोत :गुगल

पुसदचा असा प्राचीन इतिहास सध्यातरी अज्ञात आहे. पुसदहुन वाकाटक साम्राज्याच्या सर्वसेन शाखेची राजधानी वत्सगुल्म (आजचे वाशीम) ६० किलोमीटर अंतरावर असल्याने कदाचित याच काळात इतिहासाच्या सुरुवातीच्या शतकात हे गाव वसले असावे.

पुसदचे जुने नाव पुष्पावंती असे होते ज्याच्या उत्पत्तीबाबत दोन तर्क आहेत ते असे

१) हे नाव पुष्पावंती नामक राणीच्या नावावरून पडले (ही राणी कोणत्या वंशातील होती तेही कोणी जाणत नाही).

२) हे नाव तेथून वाहणाऱ्या पुष्पगंगा (आजची पूस नदी) नदीच्या नावावरून पडले.

यादव काळात हे शहर एक महत्त्वाचे स्थळ असावे कारण काही दशकांपूर्वीपर्यंत येथे यादवकालीन हेमाडपंती बांधणीची मंदिरे चांगल्या अवस्थेत होती (दुर्दैवाने ती आज मोडकळीस आली आहेत).

पुसदचे एक हेमाडपंती मंदिर , चित्रस्त्रोत : श्री रजत मुक्कावार

गावाच्या परिसरात यादवकालीन अशी महादेवाची १२ मंदिरे आहेत ज्यांपैकी काही आधुनिक प्रकारे बांधली आहेत. या मंदिरांबाबत अशी आख्यायिका आहे की प्रभू श्रीरामचंद्र माहुरहून नाशिककडे जाताना या परिसरात जेथे थांबले व तेथे महादेव लिंगस्वरूपात उत्पन्न झाले व ते तेथे कायम वास्तव्य करतात. त्या १२ मंदिरांची नावे ही अशी

  1. हटकेश्वर (पूस नदीच्या काठावरील पुसद नगराचे ग्रामदैवत)
  2. खोलेश्वर (हेमाडपंती बांधणीच्या मंदिरांपैकी चांगल्या अवस्थेतील एकमेव मंदिर)
  3. करूणेश्वर (पुसनदीच्या काठावर)
  4. जागेश्वर (पुसनदीच्या काठावर)
  5. पाचलिंगेश्वर (पुसनदीच्या काठावर)
  6. कोंडेश्वर (मौजे हर्षी येथील डोंगरावरील मंदिर जे तेथील पोळा सणाकरिता प्रसिद्ध आहे)
  7. शेम्बाळेश्वर (मौजे शेंबाळपिंपरी)
  8. अंचुळेश्वर (पैनगंगा नदीवरील ईसापूर धरणाजवळ)
  9. कान्हेश्वर (पुसनदीवरील वेणीच्या धरणाच्या पाण्याने ३ बाजूने वेढलेले मंदिर)
  10. धनकेश्वर (विसाव्या शतकात उत्खननात सापडलेले मंदिर जिथे महाशिवरात्रीस मोठी जत्रा भरते)
  11. दक्षिणेश्वर , (मौजे हुडी)
  12. केदारेश्वर , (मौजे पांडुरणा)

पुसदची ग्रामदेवता , हटकेश्वर , चित्रस्रोत : श्री रजत मुक्कावार

याप्रदेशास महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा सहवास लाभल्याचे त्यांचे शिष्य मानतात व आजही या प्रदेशातील खांडींंचे (एकमुखी दत्ताचे मंदिर जेथे चक्रधर स्वामींचा पदस्पर्श झाला असेल) दर्शन घ्यायला येतात.

गावात एका उदासीन महाराजांनी जिवंत संजीवनी समाधी घेतल्याचे देखील सांगितले जाते ज्यावर जुने मोडकळीस आलेले हेमाडपंती मंदिर आहे.

सतराव्या शतकात हा परगणा असल्याचा उल्लेख थेट ऐन-ए-अकबरीत आढळतो. हा प्रदेश माहुरच्या मुघल जहागीरदारांकडे होता , शिवछत्रपतींवर औरंगजेबाच्या आज्ञेवरून चालून आलेली सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबघन (राजेराम उद्धवराव उर्फ राजे उदाराम यांची पत्नी) ही याच माहूरची जहागीरदारी संभाळायची व आजही यांचे वंशज पुसदच्या परिसरात राजे आडनावाने राहतात.

ब्रिटिश काळात निजामाने त्याच्या ताब्यातील हा प्रदेश इंग्रजांना इसवीसन १९०३ मध्ये सुपूर्द केला होता. तेव्हा १९०५ पर्यंत हे गाव वाशीम जिल्ह्यात होते जे वाशीम जिल्ह्याच्या विभाजनानंतर यवतमाळ जिल्ह्यात गेले. पुढे १९१२ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुसदला एका सभेस संबोधित केले होते , त्यावेळी ते जिथे उभे राहिले होते तेथे आटलेल्या नदीच्या पात्रात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

१९१४ मध्ये गावातील काही देशभक्त मंडळींने टिळकांच्या स्वदेश तत्वाचे पालन करत स्वदेशी शिक्षणाच्या हेतूने शाळा उभारली , यासाठी कोंडोपंत कोषटवार यांनी धन दिले तर काळी येथील इजारदार दौलतखान पटेल यांच्या विधवेने ८ एकर जमीन दिली ज्यावर आजही ही शाळा उभी आहे. या शाळेस कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद असे म्हणतात. ही महाराष्ट्रास दोन मुख्यमंत्री देणारी शाळा असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे.

पुढे १९३० मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जंगल सत्याग्रह सुरू होता तेव्हा पुसदकर शांत नव्हते , माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे व त्यांचे मित्र शंकरराव सखाराम सरनाईक यांनी मिळून याच परिसरात चिंचगव्हाण येथे ब्रिटिश सरकारने प्रतिबंध घातलेली झाडे तोडून जंगल सत्याग्रह घडवून आणला.

स्वातंत्र्यानंतर हुडीचे जमीनदार गोधाजी सखाराम उर्फ बाबासाहेब मुखरे हे येथील पहिले आमदार होते , असे म्हणतात की त्यांनी निजामास एका रात्री ३०० बैलगाड्या वापरून रातोरात लुटून ते धन पुढे भारत सरकारच्या स्वाधीन केले. त्यांनी १९५२ साली आमदारकीचा त्याग केल्यावर ती संधी डॉ दत्तात्रेय शंकर उर्फ भाऊसाहेब सरनाईकयांना मिळाली पण त्यांनीही ती नाकारल्यावर त्यांचे शेजारी व गहुलीचे नवोदित बंजारी समाजाचे युवक वसंतराव फुलसिंह नाईक हे आमदार झाले व पुढे जाऊन १९६३-१९७५ म्हणजेच सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. पुसदनेच पुढे १९९१-१९९३ पर्यंत कार्यरत असलेले दुसरे मुख्यमंत्री व वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव राजुसिंह नाईक दिले जे पुढे हिमचलप्रदेशाचे राज्यपाल झाले.

पुसदमध्ये अशी एक वदन्ती आहे की वसंतराव नाईकांना त्यांची कुलदेवी पोरीयागडची पोहरादेवीचे वरदान होते की पुसदमध्ये त्यांची सत्ता ३ पिढ्या चालेल ज्यात पहिल्या पिढीत खुद्द वसंतराव फुलसिंह नाईक , दुसऱ्या पिढीत पुतणे सुधाकर राजुसिंह व मनोहर राजुसिंह नाईक , तिसऱ्या पिढीत विद्यमान आमदार इंद्रनील मनोहर , ययाती मनोहर व भाजपचे प्रतिनिधी निलय बिन मधुकर राजुसिंह नाईक हे आहेत.

नाईक घराण्याचे पुसदचे पिढीजात घर , चित्रस्रोत : श्री रजत मुक्कावार

सुधाकरराव नाईकांनी १९८९ मध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळस्थापन केले ज्याच्या अंतर्गत आज पुसदमध्ये अनेक महाविद्यालय आहेत. तसेच गावात १८८६ साली स्थापन करण्यात आलेले एक जुने वाचनालय आहे ज्यास देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय म्हणतात.

पूर्वी या गावाची सीमा मेंढ्या मारोती हे मंदिर होते जी आज वाढत जाऊन वाशीममार्गावर शासकीय अतिथीगृह व दुसरीकडे श्रीरामपूर या गावापर्यंत पर्यंत पोहोचली आहे.

अधिक माहितीसाठी पुढील दुवे बघावे

पुसद विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया

यवतमाल-वाशिम लोक सभा निर्वाचन क्षेत्र - विकिपीडिया

Vasantrao Naik - Wikipedia

Sudhakarrao Naik - Wikipedia

JANTA SHIKSHAN PRASARAK MANDAL, PUSAD

श्री रजत संजय मुक्कावार यांचे विशेष आभार

Comments

Popular posts from this blog

'कोकण' हे नाव कसे पडले?

महाराष्ट्रातील कोणत्या गावांची नावे विनोदी आहेत?