'मराठवाडा' हे नाव कसे पडले?
‘मराठवाडा’ हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे माहेरघर आहे. गोदावरी नदी मराठवाड्यातून वाहते. मानवाने वस्ती केली ती नदी, तलाव अशा जलाशयाच्या काठी. मराठी संस्कृती बहरली ती गोदावरीच्या काठावर. प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ, लेखिका आणि विचारवंत इरावती कर्वे यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्राचा सांस्कृतिक गाभा गोदातीर आहे. सांस्कृतिक दृष्टीने प्राचीन महाराष्ट्र म्हणजे बृहत्तर मराठवाडाच होता. (संदर्भ : मराठी लोकांची संस्कृती)
पाणिनीच्या अष्टअध्यायीत ५५ भारतीय जनपदांची नोंद आहे, त्यात ‘अश्मक’ हे दक्षिणेतील महत्वाचे जनपद होते आणि त्याची राजधानी पैठण होती. त्यानंतर सातवाहनांच्या दोन राजधान्यांपैकी पैठण हे एक होते. त्यानंतर राष्ट्रकूट आणि यादव या मराठी राजांनी याच गोदाकाठच्या भागातून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
एकंदरीत पाहता हा भाग म्हणजे मराठी माणसाचे मूळ वसतिस्थान आहे. म्हणून मराठी माणसाचे घर म्हणजे वाडा या अर्थी गोदातीरावरील या भागाला ‘मराठवाडा’ असे नाव पडले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आताचा मराठवाडा विभाग हा पूर्वी निझामाच्या हैदराबाद राज्यात होता. हैदराबाद राज्य हे बहुभाषिक राज्य होतं. तिथे तेलुगू, मराठी, दक्खनी उर्दू आणि कानडी भाषा बोलणारे लोकं राहत होते.
प्रशासकीय सोयीसाठी निझामने वेगवेगळ्या भाषिक उपविभागांना वेगवेगळे नाव दिले.
तेलुगू भाषिक जिल्हे मिळून तेलंगणा.
कन्नड भाषिक जिल्हे मिळून कन्नड.
आणि मराठीभाषिक जिल्हे मिळून मराठवाडा.
त्यावेळी मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड आणि आदिलाबाद जिल्हे येत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment